Posts

Showing posts from 2008

इडिपसाचे किंचित जुने वर्तमान

स्टेजवर निरामय अंधार पसरलेला. नाटकाच्या वाचनाला स्टेजचा हट्ट करण्याची दोन कारणं; नाटक ही केवळ गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे ही दृष्टी आणि स्टेजचं असणं. तर, स्टेजवर निरामय अंधार पसरलेला. अंड्यातल्या बलकासारखा कोवळा पिवळसर प्रकाश मध्याभागी ठेवलेल्या ३-४ खुर्च्यांवरुन ओसांडून वाहात असतो आणि अंधाराचं एक टोक पकडून मी स्टेजच्या एका कोपरयात बसलेलो. अंधाराचा अवकाश मोठा सुखद असतो. शरीराचे निर्बुद्ध प्रतल कुणाला वाचता येत नाही की डोळ्यांमधून उमटणारे अर्थांचे नाचरे बेबंद मोर कैद करावे लागत नाहीत. आरसा देखील झाकावा लागत नाही अस्सं माहेर भेटतं अंधाराच्या कुशीत. अंधाराच्या पल्याड अजून थोडा अंधार असावा तशी तू गर्द काळी शाल पांघरुन विरुद्ध अर्थाच्या कोपरयात बसलेलीस. काय करत असावीस? अनंत रिकामेपणात वैयक्तिक रिकामेपण मिसळलं की सीनर्जी होत असेल का निर्माण? कठीणपणे लपत होतं तुझं लख्ख लावण्य त्या काळ्या शालीत आणि तसे तुझे अट्टहासही नसावेत बहूदा. मी तुला निरपेक्षपणे पाहात राहातो. समाधी मोडते कारण नाटकाचं वाचन सुरु होतं; राजा इडिपस! इडिपस, लुई, जोकास्टा सारे पुस्तकातून जीवंत

मरा साले हो

मरा साले हो मराच तुम्ही. तुमची तीच लायकी आहे. झाकलेत डोळे? हां आता मी गाणं म्हणतो "कुणी तरी यावं, बॉम्ब टाकून जावं" भ्याड आणि नामर्द येतं कुणी आणि तुमच्या बरगडीत (हो, त्याचीच कुणी शस्त्र केली होती कधी!) बंदूक टोचून टुचकवतं तुम्हाला आणि तुम्ही कुत्र्या-मांजरासारखे मरुन पडता रस्त्यावर बेवारश्यासारखे. तुम्ही हुतात्मे नाही झालात तरी मॄतात्मे व्हाल आणि उदार मायबाप सरकार "सानुग्रह" मदत देईल तुम्हाला. पण साले तुम्ही टुचकेच. सानुग्रह मदत मिळण्यासाठीपण तुम्ही कुणालातरी पैसे चाराल आणि उरल्यासुरल्या भिकार तुकड्यांवर येडझव्यासारखे टॅक्स भराल. टॅक्स म्हणजे कापुसकोंड्याची गोष्ट. विचारता त्याचं काय होतं ते? टॅक्स मधून लोकांनी, लोकांसाठी, लोकांमधून निवडुन दिलेल्या सरकारची yz सिक्युरिटी येते. त्यांच्या खुर्चीखाली बॉम्ब फुटत नाहीत, इन शॉर्ट, ते तुमच्या सारखे सामान्य आणि टुचके नाही राहात. टॅक्स मधून तुरुंगात राहाणारया आणि सरकार नसून सरकार असणारया सोद्यांची सोय होते. सोदे कंटाळले की बाहेर येतात आणि दिवाळी समजून पाच-पन्नास फटाके फोडतात. आणि तुम्ही? तुम्ही नेमक्यावेळी नेमक्या ठिकाणी असल्

आरसा आपुलिये/आंगी आपण पाहे/तरी जाणणें जाणों लाहे/आपणयातें

मुलभुत, उदाहरणार्थ हिंसा, सत्ता, निष्ठा किंवा व्यभिचार वगैरे वगैरे... ... कॉलनीच्या ओसाड पटांगणात महाळुंग्यानं उगाच रिकाम्या फुटबॉलला लाथ घातली. पंधरा-वीस मिनीटांत निदान तीनवेळा तो वॉचमनला वेळ विचारुन आला होता. रवीवारी दुपारी काही केल्या दोनच्या पुढे घडाळ्याचा काटा काही सरकत नव्हता. या वेळी कुणाच्या घरी जाऊन खेळायचं म्हणजे फुकटात शिव्या खायच्या इतपत व्यवहार त्याला माहीत होता. रिकाम्या गोकर्ण्याचं तसं नव्हतं. तो येताना सगळ्या मित्रांची दार वाजवत आलेला. दार वाजवल्यावर ’कोण’ या प्रश्नाचं उत्तर देण्याइतपत पण रिकाम्या तिथे थांबला नव्हता. रिकाम्याला पाहून महाळुंग्याला उगीच बरं वाटलं. रिकाम्याचं भरुन वाहाणारं नाक आणि विटके कपडे यांच्या पलीकडेही महाळुंग्याला रिकाम्या आवडायचा. म्हणजे साहित्यीक भाषेत कसं इमानी वगैरे होता तो. महाळुंग्यानं प्रेमाच्या भरात आरोळी ठोकली "हैश्य्य्य्य्य्य्य्य." फुटबॉलला मनसोक्त तुडवून झाल्यावर रिकाम्यानं खिशातून मोर मारुन भरल्यासारखी निळीगर्द गोटी काढली आणि डोळ्याला लावून गंमत बघायला लागला. "च्यायला" मैदाच्या पोत्यासारखा भुस

देवी

देवी, नेसत्या आत्म्यानिशी भेटलेल्या स्त्रीयांची माणूस-रुपं. तीन वेगवेगळ्या कालखंडात (!?) लिहीलेल्या कविता, एकत्र जोडून काही अर्थपुर्ण होतय का ते बघतोय... देवी-१ //१// बर्फ वितळतो मणक्यात माझ्या, मरणगंध पुन्हा दरवळतो त्याच्या अभिषेकात. सांगा देवीजी, तुमचं अस्तित्व एखाद्या अभिशापासारखं का भासतं? माझे रंग, गंध, सूर, छंद सारे कसे ओढून घेतात स्वतःला स्वतःतच //२// आज तुमच्या नावाचा गोंधळ देवीजी, जागरणाला याल नां तुम्ही? आमच्या उभ्या देहाचा पेटलाय पोत, त्यात मनाच्या गाभारयात घुमतं तुमचं बोलणं उदासारखं. घुसमटतो माझा प्राण. आत्मव्देषाचा हा उत्सव तुमच्याच आशिर्वादाने पार पाडतोय मी. तुम्ही दिलेल्या लक्ष लक्ष जिव्हारजख्मा प्रत्येक क्षणात मरणाशी तडजोड करतात कवितांच्या बोलीवर. या कविताही तुमच्या व्रताचं उद्यापन //३// तुम्ही माझ्या? मी मात्र सर्वस्वी तुमचाच. माझ्याकडून बांधलेले संबंधांचे दोर आणि तुम्ही तगवलेलं नातं निव्वळ दुःखाचं सुंदर देवी-२ //१// देवी, तू जननी या शोधाची आणि सनातन नात्याची आद्यकडी. माझ्या रक्तातील पेशीपेशीत तुझं

रेषेवरची अक्षरे..०८

१९०९ मधे रघुनाथरावांनी दिवाळी अंकाची एक अनोखी प्रथा मराठीत सुरु केली आणि आज शताब्दी वर्षात या प्रथेला आमचा हा सलाम... http://sites.google.com/site/reshewarachiakshare2008/

बोका

नवकथेतून आल्यासारखा बोका बराच वेळ रिकामा विचार करत बसला. रात्रीची झोप उत्तम झाली होती. सकाळी सकाळी ऊन खाऊन झालं होतं पण त्याचा काही केल्या आज मूड येत नव्हता. गल्लीतल्या चार-दोन उनाड आणि उथळ मांजरींनी त्याच्याकडे बघून शेपूट हलवली होती खरं पण त्याला अजिबातच रोमॅन्टीक वाटलं नाही. एका नॉर्मल बोक्यासाठी हे अतीच होतं नाही का? कोपरयातल्या लव्हबर्डच्या आवाजाने त्याची समाधी मोडली आणि स्मिताने ठेवलेल्या भांडंभर दुधावर त्याने रात्रभराचा उपास सोडायला सुरुवात केली. स्मिताचं खरं नाव स्मिता नसून स्मिथा राव आहे हे बोक्याला नसलं तरी आपल्याला माहीती हवं. पण बोका आणि इतरही बरेच लोक स्मिथाला स्मिता, स्मित किंवा मिस राव अश्या अनेक नावांनी ओळखायचे. बोक्याशी तादादत्म्यता म्हणून आपणही स्मिताच म्हणू या. स्मिताचं आयुष्य वेळापत्रकाचे रकाने असतात तसं चौकोनी; ऑफिस- ऑफिस-ऑफिस-आणि घर. पहाटे घर सोडण्यापुर्वी नाईलाजाने आरसा बघायचा आणि घाईघाईने ऑफिसच्या दिशेने गाडी हाकायची. एकदा का त्या स्वाईपिंग मशिन मधे ऍटेन्डन्स कार्ड घातलं की चरकातल्या उसाला होत नसेल तितका आनंद स्मिताला व्हायचा. बाकीच्या बरयाच मुली ऑफिसात आल्या की

डॅड, डोन्ट किल सुपरमॅन

Hey Dad, तू कधीच कॉमिक्स आणून नाही दिलंस मला. विचारलं की म्हणायचास कल्पनाशक्ती झडते आणि मला ही ते नेहमी सारखं पटून गेलं! अधूनमधून हातात येणारया अमरचित्रकथा सोडल्या तर मधल्या काळात खानदानी पुस्तकं माझ्यात खोलवर रुजत गेलेली. पानांपानांवर उगवलेले शब्द आणि त्या शब्दांना लगडलेल्या अर्थांच्या कित्येक शक्यता यांनी मनावर गारुड घतलेलं. पण मग नवल झालं. जाळीफेक्या स्पायडी पुस्तकातून टीव्हीत घुसला. त्याचे अगम्य शत्रु पुराणकथांहून चमत्कारीक होते. त्याची अक्कल फा.फे.हून वेगळ्या कुळीची होती आणि त्याचं विश्व कदाचित विरधवलाहून चित्तथरारक होतं. मध्येच कधी तरी अर्चुनं सुपरमॅन, मॅन्ड्रेक आणि फॅन्टमशी ओळख करुन दिली आणि सुपरहिरोजची एक पंगतच माझ्या अंगणात झडली. नथिंग रॉन्ग आफ्टर अ पॉईन्ट ऑफ टाईम, यू सेड, खरं आणि खोट तुझं तुलाच कळेल! तू बरोबर होतास डॅड. चिरंतन सोबतीला कोणती पुस्तकं राहातील हे कळण्या इतपत शहाणा करुन सोडला होतास तू मला. नंतर कधी प्रकर्षानं कुठलाच सुपरमॅन नाही आठवला मला. पण आज, जेव्हा मी तीन, तेरा किंवा तीस कुठल्याही वयाचा असू शकतो, मला सुपरमॅन कुठे तरी असावासा वाटतो. उन्मळुन पडणारी माणुसकीची मु

किनारे

सखीचे किनारे असे पावसाळी जसा बुद्ध डोळ्यातुनी हासला कुठे नीज तारे कुठे शुभ्र अश्व तुझा थेंब थेंब देह चित्रावणे विरक्तात का रे नभांचे आरक्त आणि पावसाळाही ओला झरे सखीचे किनारे असे भासशाली जणू श्वास श्वासातुनी वाकले

गोदोसाठीची कविता: ऍज इज आणि टू बी

ऍज इज.. थंड काचा भावनाविरहीत आणि मध्येच उभ्या केलेल्या पुठ्ठ्यांच्या चंचल भिंती, हवी तेव्हा पाचर मारता येते अन हवी तेव्हा काढता ही येते पण त्याचं काय? अल्याड-पल्याड तीरावरची माणसं गुमान पणे यंत्रातुन बोलत राहातात यंत्रवत किंवा गुहेत त्यांच्या बापजाद्यांनी काढलेल्या चित्रांसारख्या जुन्याच खुणा नव्याने वापरु लागतात तारखांनुसार देयकांची कोष्टकं फळ्यांवर डकवलेली आणि आकड्यांचे जादुयी अनेक आलेख विस्कटुन फिस्कटुन जमिनीच्या सात बोटं वर तरीही नशिबाचेच लेख मग दिवसांच्या बदल्यात माणसांचे आदीम सौदे अमुक दिवस = तमुक माणूसकाम काम झालंच तमाम! नवे मंत्र, नवेच परवचे एफर्ट.. शेड्युल.. डब्लुबीएस..आणि मॅनमन्थ ...टू बी? सुख-दुःख अर्थ-निरर्थ लिहीणं- न लिहीणं असणं-नसणं आणि असं फालतु, बाष्कळ बरंच काही गोदोसाठी सारं अर्थाअर्थी समानार्थी गोदोला रुढार्थानं सुखी म्हणता मग? आपण तरी ही गोदो होणार नसतो आपण फक्त गोदोची वाट पाहायची उपद्व्याप आणि अट्टहास याच्या अध्यातमध्यात गोदोच्या शोधाचे सुवर्णमध्य मॉल, नाटकं, सिनेमे कथा आणि हो कवितात देखिल

अदृष्यांच्या भेटींचे दृष्टांत

बेटां-बेटांनी बनलेली असतात माणसं. प्रत्येक ओळखी साठी एक नवाच कप्पा, एक नवंच बेट. वाहात बेटे जवळ आली तर माणसांचं जंगल होईल याची भिती. पूर आलाच तर काही बेटांना बुडवुनही पुराणकालीन नोहा सारखी बाकीची बेटे वागवत मानवजातीचं अस्तित्व मिरवत पुढे जायचं आपण. पण आता हे वेगळं. आता हे वेगळं, कारण मी स्वतःच स्वतःला तुझ्या बेटावर पुनर्वसित करत आहे. फाळणीसारख्या काही खुणा, किंचित कत्तलींचे इतिहास आणि आठवणी साठवणारया मेंदुंच्या काही पेशी मागे सोडून मी आज तुझ्या वसतीला आलोय. रंगांचे काही तलाव होते माझ्या बेटावर, तिथून तुला आवडणारे करडे, तपकिरी, काळपट रंग आणलेत मी. तश्याच काही विराण्या रागदारीतून अन शुष्क, विराण, बेभान ऋतु सोबतीला. तू म्हणालीस एकट्या माणसाला इतकं पुरेसं असतं. मी तुझ्या वसतीला आलो आणि मी हे लपवले नाही. मी काहीच लपवत नसतो पण माझ्या आगमनाचे उत्सवही तू किंवा मी साजरे केले नाहीत. किंबहुना आता नवेच पाठशिवणीचे खेळ सुरु झाले आहेत. तुझ्या शहरात राहायचं आणि तुलाच टाळायचं. हे खेळाचे नियम की आपल्या संबंधांचे तोल सांभाळण्याचे आटोकाट प्रयत्न; मला कळत नसतं. तुझ्या असंख्य चेहरयातला एक आर्टी चेहरा मी निव

आवडलेले थोडे काही

मित्रांनो, खुप दिवसांनी एक नवा खो-खो सुरु करतोय. विषय तसा बहुतेक सगळ्यांच्या आवडीचा आहे त्यामुळे मझा यावा हीच (श्रींची!) ईच्छा. कविता जश्या बालभारतीच्या तावडीतुन मुक्त झाल्या, तुम्हा-आम्हाला त्या (अचानकच?) आवडायला लागल्या. त्या आवडीनिवडीतही जिवाच्या जवळ असणारया काही कविता असतातच. हा खो खो अश्याच कवितांसाठी. यावेळी खेळाचे नियम जssरा बदलतोय. १. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा २. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २) ३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा ४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही ५. अजून नियम नाहीत :) --------------------------- XXXXXXXXXXXXXXX- ----------------------- सख

खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी

खुप आधी नाटकांविषयी लिहीलं होतं. नाट्यगीतांविषयी न लिहीतो तर कुठे तरी आत रुखरुख लागली असती. मराठी गाण्यांची पहीली आठवण म्हणजे भावनातिरेकाने मळमळणारी करुण, दारुण भावगीते. रस्त्यावरची भिकारीण असो की कॉलेजात जाणारी चंपट पोरं असो, सारी आळवुन आळवुन शुद्ध, दाणेदार, स्वच्छ, सुमधुर आवाजातच गाणार. ते खोटे शब्द, खांडेकरी आदर्शांचा काव्यगुळ यात खरं तर मराठी गाण्यांचा आमच्या पुरता मुडदाच पडला असता पण.. ..पण वसंतराव भेटले. वसंतराव म्हणजे बाप-माणुस. आधी नुस्तंच "घेई छंद मकरंद" आवडायचं कारण त्यातली तानांची भराभरा उलगडणारी भेंडोळी. "घेई छंद" चं विलंबित व्हर्जन मिळमिळीत वाटायचं आणि तडफदार वसंतरावांबद्दल आदर द्विगुणित व्हायचा. तेव्हा उत्तुंग नाट्यशिल्प (कदाचित) दुसरया कुठल्या तरी नावाखाली कॅसेटच्या स्वरुपात मिळायचं. कान जरा सेट झाल्यावर "घेई छंद" च्या विलंबित लयीची पण मजा कळायला लागली. तो पर्यंत वसंतराव नुस्ते छा गये थे. "मृगनयना रसिक मोहीनी" सारखं तलावातल्या चांदण्यासारखं संथपणे पसरत जाणारं गाणं असो की "सुरत पिया की" सारखी दमसाजाची परिक्षा घेणारं, प्रचं

भरल्या पोटीचा न-अभंग

कोंबड्यागत फोनाचे आरविणे-मेलाचे फोनातच चेकविणे स्वप्नांच्या बुडावर लाथविणे-आपणची आपुल्या निग्रहाने पुस्तक मिटणे-एमओएमांमागे जीवा पळविणे पापण्यांना तिष्ठविणे-भरल्या पोटी कळफलकावर कळा काढिणे-दुसरयांच्या घाणी निस्तरणे आपुल्या खालचे जळणे-कोणा न दिसे सश्याचे आतची धडधडणे-श्वासांचे येणे अन रेंगाळणे सुरांचे आर्त आळविणे-मनयोगासाठी शब्दांचे अर्थहीन बुडबुडणे-सुखासुखी सुख बोचणे त्रासाला करवुन घेणे-याचा उपाय नसे

काळेकुट्ट सर्पगार काही

//१// दिवाभीत काळोखात देखील त्याला मानेवरुन पाठीकडे सरकणारे सर्पगार स्पर्श जाणवले. क्षणापुर्वी थोड्या अंतरावर झालेल्या कारच्या स्फोटाने त्याचे हात अजूनही थरथरत होते. चार फौजी ऑफीसर वाळुच्या किल्ल्यासारखे विस्कटुन गेले होते. कुणाचं काय कुठं होतं हे न ओळखु येण्याइतपत विस्कटलेले! त्याला मौलाना आठवले. ज्या विश्वासाने त्यांनी त्याच्यावर ही कामगिरी सोपविली होती, तितक्याच सफाईने त्याने ती पार पाडली होती. त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या असंख्य अपमानित बांधवांचे मळलेले पण आज हसणारे चेहरे तरळत होते. एमआयटीतला केमिकल इंजिनिअर ते धर्मयोद्धा, एक कठीण अंतर केवळ श्रद्धेपोटी त्याने पार केले होते. मौलाना भेटले नसते तर आजही तो एमआयटीच्या लॅबमधे प्रयोग करत बसला असता. एमआयटीच्या आठवणीसरशी त्याला तिथेच भेटलेली अबिदा आठवली. त्याच्या डोळ्यात तिचे उष्ण श्वास उतरले पण जाणवलेच नाहीत. मात्र मणक्यावरचे सर्प आता अधीकच धीट झाले होते. त्याने स्वतःची पाठ चाचपून बघीतली, रक्ताचा एक काळसर लाल ओघळ गडद होत जात होता. कदाचित बॉम्बचा एखादा तुकडा उडून त्याच्या पाठीत रुतला होता. विषारी मृत्युची चाहूल त्याच्यातल्या इंजिनिअरला आधी

बिनबुडाची टिपणं

काही टिपणं फार विक्षिप्त असतात. त्यांना ना बुड ना शेंडा पण त्यांचं अस्तित्व काही नाकारता येत नाही. बरं दोन टिपणांमधे काही साम्य असावंच असा ही नियम नाही. पारयासारखी ही टिपणं मनाला येईल तेव्हा एकत्र होतात आणि मनाला येईल तेव्हा परकी होतात. पण म्हणून लिहीलं नाही तर उरावरही बसतात आमच्या सोसायटीकडून डहाणुकरला जाताना स्मृतीवन लागतं. किंचित जंगल म्हणता येईल इतपतच झाडांची दाटी आहे तिथे. सवयीने तिथली झाडे शिळी झालेली. हल्ली साधं लक्षही जात नाही तिकडे. परवा अखंड पाऊस पडत होता आणि अचानकच हिर्व्या रंगाचं काहूर माजलेलं दिसलं स्मृतीवनात. जुनीच कविता आठवली झाडे शांत रात्रीच्या येण्यानंतरही स्तब्धतेची शाल पानांआडून सावरुन किंचितशी दमल्यासारखी झाडे सारे ऋतु पानगळ मनात असून नसल्यासारखी अलिप्त खोल मुळे गाडून घट्ट उभी राहील्यासारखी झाडे माणसांवर कलम होतात कधी स्वतःच्याही नकळत रुजून जातात झाडे, मात्र वाटतात कधी कधी झाडांसारखी झाडांची आठवण निघावी आणि फुलांचे ऋतु आठवु नयेत म्हणजे शुद्ध क्रुरपणाच. काय गडबड आहे मेंदुत माहीत नाही पण मला कधी गुलाबाचा वासच येत नाही. सुगंध म्हटलं की आधी माठातल्या पाण्यात तरळणारा मो

पानांवर प्राण पखाली

पानांवर प्राण पखाली शपथांचे नवे बहाणे पाऊस कधीचा पडतो उठवित निजली राने या गावामध्ये असतील चैतन्य भारले रावे रक्ताला फुटणारे पण गाणे कोणी गावे पाऊस चिंब भिजलेला गारांचा फसवा तिड धा श्वासात तुझ्या भासांनी विस्कटलेली राधा तो मदमत्त मातीचा गंध ते ओले गुणगुण पाते हातातून क्षितीज हातांचे पारयागत निसटुनी जाते तू ये नां श्रावण बनूनी झुलव्यांचा बहर कुणाला हिरव्या गवतावर माझा बघ श्वास मोडूनी गेला

ओ सुनी ओ मीरा

सुनी मेंदुचे तळ ढवळले की हरवलेली माणसेही मिळतात हे माझे साधे गणित. तू आठवणींच्या कोणत्याही कप्प्यात नाहीस याची खात्री होत असतानाच हाक दिल्यासारखी तू भुतकाळातुन हळुच डोकावलीस सुनी आणि संभ्रमाची पिशाच्चे झाली. जशी तू, तश्याच तुझ्या आठवणीही मुकाट सोशीक. सुनी, दिसायचीस तेव्हा कायमच काम करत असायचीस तू आणि विश्रांती म्हणून तुझ्या भावांना सांभाळायचीस फावल्या वेळात. आम्हाला खेळात एक गडी कमी पडला की तुझ्या साठी तुझ्या आयशीशी भांडायचो आम्ही म्हणून तुझी तात्कालिक सुटका आणि आमच्या ससंदर्भ स्वार्थाचं आता सुचणारं उदात्तिकरण. पायात चप्पल नाही, आखीव वेणीला तेलाचं बोटं नाही अश्या अवस्थेत परकराचा ओचा खोचून दात ओठ खात तू सागरगोटे उंच उडवायचीस तेव्हा मंत्रावल्यासारखं व्ह्यायचं. वरच्यावर तू झेललेले सागरगोटे पाहावेत की दुसरया हाताने उचलेले जमिनीवरचे सागरगोटे हे कळायच्या आत डाव संपलेला असायचा. 'पहीलं दान देवाला' हे तुझं पालुपद आमच्यापैकी कुणी तरी जिंके पर्यंत सुरुच असायचं हे तेव्हा कधीच कळालं नाही. चांदण्याच्या रात्री देवीचा गोंधळ असायचा. तेलाच्या दिव्यांच्या मंद प्रकाशात त्या घुमणारया बाया भयंकर वाट

मसाज

"खुप खुप काम केलं की काय होतं म्हाराजा?" "दमायला होतं पण मज्जा येते बुवा" "म्हाराजा, षडरिपुंबद्दल नाही, आपण हापिसाबद्दल बोलत आहोत. आता परत सांगा, खुप खुप हापिस केलं की काय होतं म्हाराजा?" "बुवा, तुमी तर लाजिवलंच पार. हापिस करुन कुणाला काय मजा येते व्हय? पण त्यातुन काय कुणाची सुटका नाही बघा बुवा" "म्हाराजा, विनु-मिनु तुमच्याच सारखे प्रपंचाच्या पापात अडकलेले. त्यांनी या हापिसाच्या व्यापातुन वेळ काढून मोक्षाच्या दिशेने कशी वाटचाल केली याची ऎका ही गोष्ट" "जी बुवा" "विनु-मिनु सख्खे शेजारी. आटपाट नगरात त्यांचं देवाच्या दयेने उत्तम सुरु होतं. देवासमोर जसा नंदादिप जळत असतो तसे ते हापिसात जळायचे. त्याला आंग्लभाषेत बर्नाआऊट म्हणतात. दिव्यातलं तेल जसं कमी झालं तसं त्यांनी देव-भुमीला सहल काढायची ठरवली." "बुवा , म्हन्जे स्वर्गात?" "म्हाराजा, काय हे अज्ञान...तुम्ही सुखी होण्याची पहीली पायरी म्हणून जरा टीव्ही पाहात चला म्हाराजा. टिव्ही पाहाताना डोळे दिपून जातात. डोकं कसं सुन्न होऊन जातं. खाण्यापिण्याची शुद्ध राहात ना

मोरल ऑफ द स्टोरी?

मॅन्चेस्टरच्या एका शांत कोपरयात त्याहूनही शांत असं ते छोटंस रेस्तॉंरॉ होतं. वेगात बुडणारया ब्रिटीश परंपरेच्या शेवटच्या अवशेषांपैकी एक. रेस्तॉंरॉचं नाव टी-क्लब असलं तरी चार रिकामटेकडी म्हातारी सोडली तर तिथे क्वचितच कुणी दिसायचं. अर्थात कुणी यावं असं तिथं काही नव्हतंच. सजावटीच्या नावाखाली कधी काळी तेलपाणी झालेलं जुनाट लाकडी छत, त्यावर कोरलेली रेशीम काढण्याच्या मॅन्चेस्टरच्या जुन्या प्रथेची आताच अर्वाचिन भासणारी चित्रं, पायाखाली करकरणारं लाकडी फ्लोरिंग आणि टेबलावर छोट्या चौकानाचौकानांचं डिजाईन असणारं टेबलक्लॉथ या पलीकडे तिथे आणखी काही ही नव्हतं. पेप्सी, कोक, कॉफी, बर्गरवर वाढणारया नव्या पिढीला तिथे मिळणारया कुकीज आणि चहात कणभरही स्वारस्य नव्हतं. किंचित बहीरा, बराचसा विक्षिप्त आणि अस्सल शिष्ट इंग्रज म्हातारा तो टी-क्लब चालवायचा. दिवसभरात मोजून १५-२० लोक तिथे यायचे तरी म्हातारयाचं बरं चालायचं. आलेल्या लोकांना न हसता अभिवादन करण्याचा त्याचा रोजचा शिरस्ता मोडायचा तो फक्त महीन्याच्या शेवटच्या रविवारी जेव्हा त्या चार व्यक्ती एकत्र यायच्या तेव्हाच. त्याला कारणही तसंच होतं. ती चारही टाळकी अस्सल