Posts

Showing posts from June, 2008

पानांवर प्राण पखाली

पानांवर प्राण पखाली शपथांचे नवे बहाणे पाऊस कधीचा पडतो उठवित निजली राने या गावामध्ये असतील चैतन्य भारले रावे रक्ताला फुटणारे पण गाणे कोणी गावे पाऊस चिंब भिजलेला गारांचा फसवा तिड धा श्वासात तुझ्या भासांनी विस्कटलेली राधा तो मदमत्त मातीचा गंध ते ओले गुणगुण पाते हातातून क्षितीज हातांचे पारयागत निसटुनी जाते तू ये नां श्रावण बनूनी झुलव्यांचा बहर कुणाला हिरव्या गवतावर माझा बघ श्वास मोडूनी गेला

ओ सुनी ओ मीरा

सुनी मेंदुचे तळ ढवळले की हरवलेली माणसेही मिळतात हे माझे साधे गणित. तू आठवणींच्या कोणत्याही कप्प्यात नाहीस याची खात्री होत असतानाच हाक दिल्यासारखी तू भुतकाळातुन हळुच डोकावलीस सुनी आणि संभ्रमाची पिशाच्चे झाली. जशी तू, तश्याच तुझ्या आठवणीही मुकाट सोशीक. सुनी, दिसायचीस तेव्हा कायमच काम करत असायचीस तू आणि विश्रांती म्हणून तुझ्या भावांना सांभाळायचीस फावल्या वेळात. आम्हाला खेळात एक गडी कमी पडला की तुझ्या साठी तुझ्या आयशीशी भांडायचो आम्ही म्हणून तुझी तात्कालिक सुटका आणि आमच्या ससंदर्भ स्वार्थाचं आता सुचणारं उदात्तिकरण. पायात चप्पल नाही, आखीव वेणीला तेलाचं बोटं नाही अश्या अवस्थेत परकराचा ओचा खोचून दात ओठ खात तू सागरगोटे उंच उडवायचीस तेव्हा मंत्रावल्यासारखं व्ह्यायचं. वरच्यावर तू झेललेले सागरगोटे पाहावेत की दुसरया हाताने उचलेले जमिनीवरचे सागरगोटे हे कळायच्या आत डाव संपलेला असायचा. 'पहीलं दान देवाला' हे तुझं पालुपद आमच्यापैकी कुणी तरी जिंके पर्यंत सुरुच असायचं हे तेव्हा कधीच कळालं नाही. चांदण्याच्या रात्री देवीचा गोंधळ असायचा. तेलाच्या दिव्यांच्या मंद प्रकाशात त्या घुमणारया बाया भयंकर वाट

मसाज

"खुप खुप काम केलं की काय होतं म्हाराजा?" "दमायला होतं पण मज्जा येते बुवा" "म्हाराजा, षडरिपुंबद्दल नाही, आपण हापिसाबद्दल बोलत आहोत. आता परत सांगा, खुप खुप हापिस केलं की काय होतं म्हाराजा?" "बुवा, तुमी तर लाजिवलंच पार. हापिस करुन कुणाला काय मजा येते व्हय? पण त्यातुन काय कुणाची सुटका नाही बघा बुवा" "म्हाराजा, विनु-मिनु तुमच्याच सारखे प्रपंचाच्या पापात अडकलेले. त्यांनी या हापिसाच्या व्यापातुन वेळ काढून मोक्षाच्या दिशेने कशी वाटचाल केली याची ऎका ही गोष्ट" "जी बुवा" "विनु-मिनु सख्खे शेजारी. आटपाट नगरात त्यांचं देवाच्या दयेने उत्तम सुरु होतं. देवासमोर जसा नंदादिप जळत असतो तसे ते हापिसात जळायचे. त्याला आंग्लभाषेत बर्नाआऊट म्हणतात. दिव्यातलं तेल जसं कमी झालं तसं त्यांनी देव-भुमीला सहल काढायची ठरवली." "बुवा , म्हन्जे स्वर्गात?" "म्हाराजा, काय हे अज्ञान...तुम्ही सुखी होण्याची पहीली पायरी म्हणून जरा टीव्ही पाहात चला म्हाराजा. टिव्ही पाहाताना डोळे दिपून जातात. डोकं कसं सुन्न होऊन जातं. खाण्यापिण्याची शुद्ध राहात ना